कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे आणि किरण सामंत यांनी केलेल्या दावेदारीमुळे निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. किरण सामंत यांनी आपला दावा सोडल्याने नारायण राणे यांचा महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या मतदारसंघावरील दावेदारी सोडताना उदय सामंत यांनी काही सूचक संकेत दिले आहेत. आम्ही चार पावलं मागे आलो, म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचं असं होत नाही. आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो, त्यावर आजही ठाम आहोत. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचं हे निश्चित आहे, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी दुसऱ्या कुठल्या जागेची अदलाबदली झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उदय सामंत म्हणाले की, ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी व्यक्ती स्वत: हस्तक्षेप करते. मुख्यमंत्री काही सूचना करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे पूर्वीपासूनचे सहकारी असलेली व्यक्ती काही गोष्टी सांगते, तेव्हा काही गोष्टींमध्ये चार पावलं मागे यावं, असं आम्ही चर्चा करून ठरवलं. पण चार पावलं मागे आलो, म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचं असं होत नाही. आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो, त्यावर आजही ठाम आहोत. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचं हे निश्चित आहे. त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वत: पुढाकार घेतला, तसेच राजकारणात किती मोठं मन असावं लागतं, हे त्यांनी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, आम्ही काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला असला तरी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नारायण राणे यांच्यासोबत उपस्थित राहणार आहोत. आमचा मतदारसंघ जिल्हा हा महायुतीसोबत राहील. परंतु हे सर्व करताना अमित शाह यांनी दिलेला शब्द, देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, एकनाथ शिंदे यांचा शब्द कुठेही फुकट जाऊ नये. तसेच महायुतीमध्ये कुठलंही तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या मनाने किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय घेतला म्हणजे आम्ही किंवा आमचं कुटुंब राजकारणातून थांबलो असा होत नाही. काही काळ थांबवण्याचा निर्णय आम्ही नक्कीच घेतला आहे. काही काळ नारायण राणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पण पडद्यामागे ज्या काही चर्चा झाल्या आहेत. त्या सर्व काही प्रसारमाध्यमांसमोर याव्यात, असं माझं मत नाही. परंतु महायुतीमध्ये किरण सामंत यांचा पूर्ण मान-सन्मान केला जाईल, असं आश्वासन अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात उमेदवार कोण असतील याबाबत जो प्रश्न होता त्याचं उत्तर मिळालं आहे. तसेच नारायण राणे हे येथील महायुतीचे उमेदवार असतील आणि आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय राहणार आहोत.
आम्हाला ज्या नेत्यांनी आश्वासन दिलंय, त्यावर अविश्वास दर्शवण्याचं काही कारण नाही. खरंतर आमच्यासमोरदेखील अनेक पर्याय होते. पण त्या पर्यायांमुळे एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये, देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये, कारण त्यांनी प्रामाणिकपणे आमच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी २४ तास असतानाही काही ठरत नाही असं दिसतं असल्याने अखेर आम्ही पुढे पाऊल टाकलं आणि हा निर्णय घेतला असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.