पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:22 AM2024-08-02T10:22:45+5:302024-08-02T10:24:14+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे.
नागपूर - शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यांकडून लोकशाही मार्गानं राजकारण अपेक्षित आहे. मात्र त्यांनी सध्या घरफोडीचा कार्यक्रम सुरू केला आहे. ते ८२ वर्षांचे आहेत, त्यांची ही रणनीती नेहमीच राहिली आहे. फोडाफोडीचं राजकारण आम्ही त्यांच्याकडूनच शिकलोय असं सांगत मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
धर्मरावबाबा आत्रम म्हणाले की, शरद पवार हे ८२ वर्षांचे आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नेहमीच कोणाला पाडायचं, पक्ष कसा फोडायचा ही रणनीती असते. फोडाफोडीचं राजकारण हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलो. आता घरफोडीचा जो कार्यक्रम शरद पवारांनी सुरू केला आहे. नेत्यांच्या मुलांना फोडण्याचं काम सुरू केले आहे. त्यांनी तसं करायला नको. राजकारणात मातब्बर नेता असताना लोकशाही मार्गाने राजकारण करायला हवं. घरफोडी करून त्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही. ज्यांना कुणाला वडिलांविरोधात उभं राहायचं असेल तर त्यांचा मार्ग मोकळा आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो, इतकी वर्ष जनसंपर्क ठेवला आहे असंही त्यांनी म्हटलं.
धर्मरावबाबा आत्रम यांच्याविरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्रम यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्रम यांनी हे भाष्य केले. माझ्याविरोधात मुलगी भाग्यश्री आत्रम यांना तिकीट देतील का हा प्रश्नचिन्ह आहे. ती वडिलांच्या विरोधात उभी राहील का यावरही प्रश्नचिन्ह आहे. माझी इच्छा यंदा निवडणूक लढवण्याची नाही मात्र लोकांच्या आग्रहास्तव ही शेवटची निवडणूक लढवावी यासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या ५ वर्षात चांगली कामे मतदारसंघात केली आहे. लोकसभेत जे घडलं ते या निवडणुकीत घडणार नाही याची काळजी घेऊ. विदर्भातील २० जागांवर आम्ही तयारी करतोय. लवकरच अजित पवार विदर्भात येतील. २० जागांची चाचणी सुरू आहे. जिथं उमेदवार देऊ तिथे निवडून आणू. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देऊ अशी माहिती त्यांनी दिली. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.
दरम्यान, निवडणूक ३ महिन्यावर आहे. उमेदवार देताना त्याचे कार्य, मतदारसंघात संपर्क, पक्षाची ताकद एकत्रित करून तिकीट देणं महत्त्वाचं आहे. तरुणांना वाव मिळाला पाहिजे. तरुण उमेदवार देण्याचा पक्ष विचार करत आहे. ९० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची लढण्याची तयारी आहे. आमचे ५३ आमदार आहेत. ९० जागांमधील १०-१५ टक्के उमेदवार तरुण असतील असा विचार सुरू आहे असंही धर्मरावबाबा आत्रम यांनी सांगितले.