तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 11:42 AM2018-11-29T11:42:44+5:302018-11-29T11:43:22+5:30
राज्य सरकारकडून आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार आहे.
मुंबई - मराठा आरक्षणावरुन विधानभवनात घमासान सुरू आहे. सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, विरोधक याच मुद्द्यावरुन आणि यातील त्रुटींवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यावर, आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो आहोत, असा टोमणा चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांना लगावला.
राज्य सरकारकडून आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे यासंबंधी बोलताना, राज्य सरकार लपवाछपवी का करत आहे? किती टक्के आरक्षण मिळणार हे कधी सांगणार, असा सवाल अजित पवार यांनी विधासभेत विचारला होता. त्यास, महसूलमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. अधिवेशन संपण्याआधी विधेयक मांडू आणि कायदा आणू, वेळ न पुरल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवू, असे पाटील यांनी म्हटले. तर, आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो आहोत, असा टोमणाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
दरम्यान, राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबत अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) आणि मराठा आरक्षण विधेयक सादर होत आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालांच्या सहीने त्याचं कायद्यात रुपांतर होईल आणि मराठा आरक्षण लागू होईल. त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.