आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 10:22 PM2023-11-05T22:22:11+5:302023-11-05T22:22:28+5:30
जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.
नागपूर - अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही अशी भूमिका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली.
सुनील तटकरे म्हणाले की, सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी स्वतंत्र निडणुका लढवल्या. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सहभागी झाला. आपल्या देशात आघाडी सरकार स्थापन करण्याची अपरिहार्यता आहे. भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असं आवाहन सुनील तटकरेंनी केले.
दरम्यान, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. घड्याळाचे चिन्ह जुने तेच आहे पण आता वेळ नवी आली आहे. निर्धार नवपर्वाचा करत अजितपर्वाचा विचार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायचा आहे. जे विरोधक आम्हाला धर्मनिरपेक्षतेबद्दल सांगतात. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती. युती सरकार जाते कळताच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आले. त्यामुळे त्यांनी पक्ष निष्ठा, पक्षाची विचारधारा याबद्दल सांगू नये, असा थेट इशारा तटकरेंनी विरोधकांना दिला. त्याचसोबत विदर्भात आपल्या पक्षाची ताकद कमी आहे. आत्मकेंद्रित राजकारणामुळे नागपूरात संघटना वाढू शकली नाही. एवढे मोठे कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतरही नागपुरात स्वतःची जागा सोडून इतर जागा निवडून आणू शकत नाही त्यांनी स्वतःची तुलना अजितदादांसोबत करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी अनिल देशमुखांवर केली.