अजित पवार यांच्या बंडाशी आमचा संबंध नाही : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:44 AM2019-11-25T10:44:35+5:302019-11-25T10:46:22+5:30
पवार म्हणाले, भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली केल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तरीही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते त्यांना करता येणार नाही. तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
कऱ्हाड : शिवसेना व राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. राज्याचा प्रत्यक्ष जेव्हा निर्णय घेण्याचा विचार होतो त्यावेळेस सर्व गोष्टी पहाव्या लागतात. मात्र आमच्या पक्षातील अजित पवार यांनी जो बंड करीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांना बडतर्फ करायचे की अन्य कारवाई याचा निर्णय पक्षातील सर्वजण घेतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली म्हणून काही होत नाही. अजून सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते 30 तारखेला समजेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सौरव पाटील उपस्थित होते.