छत्रपती संभाजीनगर - जालना इथं ओबीसींची ऐतिहासिक सभा पार पडली. यामुळे आता यापुढे सामाजिक न्यायासाठी गरीब समाजाला नाही म्हणण्याची हिंमत कुणाची होत नाही. ही सभा झाकी है, अभी और भी बाकी है. हिंगोलीतील सभा अंबडपेक्षाही मोठा होईल. याठिकाणी ओबीसींचे सगळे नेते येतील. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सरकारला खाली खेचण्याची ताकद आमच्यात आहे असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, या सरकारने ओबीसी समाजाचा निधीही रखडून ठेवला आहे. आम्ही महाराष्ट्राचे नागरीक आहे की नाही? राज्यातला ओबीसी एकसंघपणे पुढे आलाय. मराठा आरक्षण हे ५० टक्क्यांच्या वर वेगळे आरक्षण करून द्या. आता मराठा समाजाची जी आंदोलने सुरू आहेत ती ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहेत. मराठा समाजाने ५० टक्क्यांच्यावर ६५ टक्के आरक्षण मर्यादा करावी यासाठी आंदोलन करावे. आम्हीदेखील तुमच्यासोबत राहू. ओबीसीत शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व राजकीय नेत्यांनी ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलंय ते टिकवण्याचं सरकार प्रयत्न करतंय. परंतु मराठा समाज त्यांची मागणी सोडायला तयार नाही. त्यामुळे मराठा आणि ओबीसी असे जे वातावरण तयार झालंय ते आम्ही केलेले नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आमचे एल्गार मेळावे, मोर्चे सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात आमचे मेळावे होतील. ओबीसी समाजाचा पहिला मेळावा रत्नागिरीत झाला होता. त्याचठिकाणी आता दुसरा मेळावा मोठ्या संख्येने होईल. कोकणातील कुणबी समाज मोठ्या ताकदीने या मागणीला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाही. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय, परतु मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय, ते गादीचे वारसदार आहेत, त्यामुळे विचारांचा वारसा अद्याप त्यांनी सोडला नाही. मराठा नेते भुजबळांवर टीका करत होते तेव्हा संभाजीराजेंनी बोलणं आवश्यक होते. ओबीसी नेत्याने काही भूमिका मांडली असेल तर त्यावर संभाजीराजेंनी वाईट वाटू घेऊ नये असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केले.
दरम्यान, बीडच्या दंगलीत कुणी कुणाची घरे जाळली, दगडफेक केली हे राज्याने पाहिले आहे. भुजबळांनी असं कुठलेही भडकाऊ विधान केले नाही. याउलट जे हिंसक आंदोलन होतंय ते मराठा समाजाकडून झाले आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जातेय. ओबीसींचा एल्गार मेळावा हा सर्व पक्षातील नेत्यांचा होता, कुणी एक नेता उपस्थित नसला म्हणून चळवळ थांबणार नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट सांगितले.