मुंबई- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. पण शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल दिली आहे. 2019 च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा बोलून दाखवलं.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'बुधवारी अमित शहा व उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये दोन तास अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबद्दलची माहिती समोर आली नाही. पण भाजपाकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तसंच राज्याच्या कॅबिनेटमध्ये पुढील फेरबदलात शिवसेनेला योग्य जागा व केंद्रातही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना जागा देण्याचं वचन भाजपाने दिल्याचं समजतं आहे.