मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्षाच्या आठ आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक आवाहन केले आहे.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यावे, असे भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड केले आहे. जितेंद्र आव्हाड शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "आम्ही त्या दोन-चार जणांमुळे बाहेर पडलो असं अजित पवार गट सांगत आहे. मला सत्तेच राजकारण करायचे नाही, पैशाच राजकारण करायचे नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर गेल्याने पक्ष खूप वाढणार आहे, तर मी शपथ घेतो की मी तर बाहेर जाईनच जयंत पाटील यांनाही घेऊन जाईन."
याचबरोबर, पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, "अजित पवार गट जयंत पाटील आणि आमच्यावर टीका करत आहे की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरले आहे. या बडव्यांना नाही राहायचं. आम्हाला काहीही नको. आम्ही सगळं सोडून जातो. तुम्ही फक्त परत या, पण साहेबांना त्रास देऊ नका." दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या भावनिक आवाहानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. शरद पवार आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.