कल्याण : आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणंघेणं नाही आम्हाला आमचं मशाल हे चिन्ह हवंय त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी आज कल्याणमधील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी जाणून-बुजून असे केले का?. शिवसेनेचा जो काही अंतर्गत वाद होता तो आता निकालात निघालाय. धनुष्यबाण चिन्ह व पक्षाचे नाव हे शिंदे गटाला मिळाले त्यामुळे आमचं चिन्ह का अडकवून ठेवलय. असा सवाल मंडल यांनी उपस्थित केला.
आमचे चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका आमचे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितल. शिवसेनेचा अंतर्गत वाद सुरू असताना २०२२ साली आम्हाला हे चिन्ह मिळाल होत, याकडेही मंडल यांनी लक्ष वेधले. दरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचेही मंडल यांनी यावेळी अभिनंदन केले. धनुष्यबाण व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांना जरी मिळाला असता तर त्यांचे देखील अभिनंदन केले असते असेही ते म्हणाले.
आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच उरलेले नाही -मशाल चिन्हासाठी काही जणांना मुख्यमंत्री पुढे करतात या संजय राऊतांच्या आरोपाचा उदय मंडल यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांची खुर्ची एकनाथ शिंदे घेऊन गेले पार्टी देखील घेऊन गेले, चिन्ह देखील घेऊन गेले तरी राऊत हे पाहत राहिले. आता त्यांच्याकडे काही उरल नाही तर समता पार्टीकडे बोटं दाखवतात त्यांच्याकडे काहीच नाही असा टोला मंडल यांनी लगावला.
ठाकरेंच्या अडचणीत वाढशिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय. त्यातच ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने दावा केल्याने ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.