औरंगाबाद - राजकारणात भाऊबंदकी नवी नाही. राजकारणामुळे अनेक घरात फाटाफूट झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिले आहे. ठाकरे घराण्यात राजकारणामुळे राज आणि उद्धव यांच्यात दुरावा आला. मुंडे घराण्यातही गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याने त्यांची साथ सोडली. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अशी अनेक उदाहारणं आहेत ज्यांची राजकारणामुळे घरे दुभंगली आहेत. धनंजय मुंडे-पंकजा मुंडे हे भाऊ बहिण मात्र या राजकारणामुळे त्यांच्यात भाऊ बहिणीचं नातं राहिलं नाही अशी कबुलीच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, आमच्यात भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याने त्याने आत्मपरिक्षण करावं. हे वारंवार अशाप्रकारची वक्तव्यं येतात ते बरोबर की चुकीचे त्याबाबत आकलन करून मांडावं. ही राजकीय विधाने आहेत. काय बोलायचं हे त्यांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले.
तसेच भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली. स्व.गोपीनाथ मुंडे असेपर्यंत ही परंपरा सुरू होती. आता कुणी मेळाव्याला जायचं कुणाला बोलवायचं. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावं हे ज्याने त्याने ठरवावं. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) हरवू शकत नाहीत,' असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरलं होते. त्यानंतर मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला होता. यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केला नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने मोदीजींचा उल्लेख केला होता, असा पंकजा मुंडे यांनी खुलासा केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"