मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि पक्षात उभी फूट पडली. नंतर, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या संपूर्ण राजकीय महानाट्याला सुरुवात झाल्यापासूनच, शिवसेनेतील ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाला, राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, असे म्हटले जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी थेट भाष्य केले आहे. तसेच, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
केसरकर म्हणाले, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही? असा सवाल करत, आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा बिलकूल नाही. आम्ही, तुमच्या बद्दल (उद्धव ठाकरे) आदर आहे, म्हणून गप्प राहतो. उत्तर देणं प्रत्येकाला येतं. पण जेव्हा दुसरा मनुष्य आपल्याला आदर देत असतो, तेव्हा तो स्वीकारताही यायला हवा. ते लोकांना आवडते.
एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते -उद्धव ठाकरेंना उद्देशून केसरकर म्हणाले, आपण म्हणता, की मातोश्रीवर आरोप झाले आणि यांनी काही केलेच नाही, असे बिलकूल नाही. हे असत्य आहे. प्रत्येकाने आपापाल्या परीने काही तरी केलेले आहे. त्यामुले एखाद्याला वाईट ठरवायचे असेल तर काहीही बोलले जाऊ शकते. हे चुकीचे आहे. मला जे सांगायचे आहे. ते मी दोन दिवसांनंतर पुन्हा सांगेन. पण एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणणे आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आमचे गटनेते आहेत. कदाचित तो तुमचा अधिकार असेल. तर, खालची अनेक नेते तसेच म्हणत असतात.
९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? -"जेव्हा तुम्ही आमच्या एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनाचा विचार करा. त्यांना काय वाटत असेल? ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्य वेचलं. महाराष्ट्रात कुठलीही अडचण आली, तेव्हा तुम्ही त्यांनाच पाठवत होतात ना? शिवसेनेची इमेज कुणी तयार केली, ९० टक्के समाज कारण आणि १० टक्के राजकारण, अशी इमेज कुणी तयार केली महाराष्ट्रात? शिंदे साहेबांनी तयार केली. कोरोना काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला. पण त्या काळात सर्वाधिक काम, हे त्यांनीच केले आहे. मग त्यांनी का ऐकूण घ्यावे? त्यांचा प्रतिनिधी म्हणून मीही का एकूण घ्यावे? हाही प्रश्न आहे आमच्या समोर. पण चुकीचे बोलू नका. जर तुम्हीही पथ्य पाळायचे ठरवले असेल, तर तुमच्या कार्यकरत्यांनाही पथ्य पाळायला सांगा. तर आम्ही म्हणून की नेत्याचं कार्यकर्ते ऐकतात," असेही केसरकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.