…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 15:51 IST2023-09-08T15:51:35+5:302023-09-08T15:51:49+5:30
निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर मागितल्यानंतर जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीत आम्ही त्यांच्याकडे उत्तर दाखल करू असंही त्यांनी म्हटलं.

…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा
मुंबई – निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल, पक्षांच्या बाबतीतले निर्णय याबाबत कायदेशीर माहिती घेऊनच आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात हे पाऊल उचलले आहे. आम्ही जेव्हा पाऊल उचलले तेव्हा निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी होत जाईल. आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
सुनील तटकरे म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. तिला घटनात्मक दर्जा आहे. निवडणूक आयोगाकडे याचिका केलीय त्यात काही मागणी आहे ती आज का सांगू. निवडणूक आयोगाच्या कोर्टात याचिका आहे. निवडणूक आयोगाकडून सुनावणी होईल. गुणवत्तेवर निकाल देईल. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तो वैचारिक आणि कायद्याच्या दृष्टीने तपासून घेतलेला आहे या निवडणूक आयोगाकडे शिक्कामोर्तब होईल असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर मागितल्यानंतर जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीत आम्ही त्यांच्याकडे उत्तर दाखल करू असंही त्यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले ९ मंत्री आणि ३१ आमदार अशा एकूण ४० आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाकडून खेळण्यात आलेल्या या खेळीनंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून शिंदे आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं विधान केलं आहे.