- अतुल कुलकर्णी
मुंबई : आम्ही औषध खरेदीची मागणी हाफकिन औषध खरेदी महामंडळाकडे नोंदवली मात्र ती औषधे कोणाला पुरवठा करायची याची यादीच दिली नाही, ही आमची व आमच्या विभागाची चूक होती, अशी कबुली सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी दिली. शेवटी विविध विभागांमार्फत औषधांची आवश्यकता नोंदविलेल्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या ५८७ कोटी रुपयांच्या खरेदी केलेल्या औषधांचा पुरवठा येत्या ७ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले.आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने खरेदी करण्यासाठीची मागणी हाफकिनकडे नोंदवली खरी, पण ती औषधे कोणाला द्यायची याची यादीच दिली नाही. परिणामी खरेदी होऊनही ती रुग्णांपर्यंत पोहोचली नव्हती. हा विषय लोकमतने समोर आणला होता.हाफकिन खरेदी कक्षाच्या कामकाजात समन्वय वाढविण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालिका संपदा मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी सात महिन्यापूर्वी मागणी नोंदवली आणि आता अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी औषधे घेण्यास नकार देत आहेत, मग खरेदी कशासाठी करायला सांगितली असा प्रश्नही बैठकीत समोर आला. काही डॉक्टरांनी तर महिलांच्या संबंधीत आजारावर उपचार केले जातात त्यासाठीची औषधेही घेण्यास नकार दिल्याचे हाफकिन कडून सांगण्यात आले. यावर तातडीने उपाय केले जातील आणि यापुढे दिरंगाई होणार नाही असे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.