मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन
By यदू जोशी | Published: November 23, 2023 12:38 PM2023-11-23T12:38:33+5:302023-11-23T12:39:48+5:30
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला
- यदु जोशी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी; उत्तन येथे भाजपचे निवडणूक प्रमुख व प्रभारींचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. शिवसेनेशी आपली नैसर्गिक युती आहे. त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यात अडचण वाटत नाही, पण राष्ट्रवादीचे काय? ते लोकसभा अन् पुढे विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार नाहीत का, असा प्रश्न काही प्रभारी व प्रमुखांनी केला. त्यावर फडणवीस यांनी विस्ताराने उत्तर दिले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादीसारखा मोठा पक्ष फुटणे आणि त्यांच्यातला मोठा भाग आपल्यासोबत येणे हा भाजपचा दुहेरी फायदा आहे. याची प्रचिती सगळ्यांना निवडणूक निकालात नक्कीच येईल. विधानसभेला काय होईल, याची चिंता तुम्ही करु नका. तुमच्या कोणावरही आच येणार नाही याची काळजी आम्ही सगळे घेऊ. दोन्ही मित्रपक्षांचे आणि आपले समसमान बळ आहे, अशा ठिकाणी काही अडचणी नक्कीच येतील, पण त्या सोडवल्या जातील.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
'फायद्यातोट्याचे गणित मांडायचे नाही'
सामाजिक ताणतणावाचे प्रश्न भाजपच सोडवू शकते असा सर्वांचा विश्वास आहे. अशावेळी राजकीय फायद्या-तोट्याचे गणित मांडायचे नाही. आपला हेतू प्रामाणिक आहे आणि आपणच तोडगा काढू शकतो असे लोकांना वाटते. आधीही असे प्रसंग आले पण २०१९ च्या निवडणुकीत आपणच बहुमत मिळविले होते, असे फडणवीस म्हणाले.