Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:59 PM2021-10-11T18:59:04+5:302021-10-11T18:59:49+5:30

Nana Patole : उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

'We will continue to fight till farmers get justice' - Nana Patole | Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार!

Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार!

googlenewsNext

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत राहू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. यावेळप्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी भाजपाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भाजपाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपा आटापिटा करत आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केली. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत.

महाराष्ट्र बंदवर टीका करणाऱ्या भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही, त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. भाजपाच्या धोरणांमुळेच देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मागील दोन वर्षांत सातत्याने नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे परंतु केंद्रातील मोदी सरकार मात्र महाराष्ट्राला पुरेशी मदत देत नाही, महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. फडणवीस व राज्यातील भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर त्यांनी मोदींना भेटून राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून द्यावी. या बंदमध्ये शेतकरी, व्यापारी व जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे, बंद यशस्वी केल्याबद्दल नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते. पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक व बंदला सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आजच्या मौनव्रत आंदोलनात विधीमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, आ. अमिन पटेल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, भावना जैन,  जोजो थॉमस, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, गणेश यादव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौनव्रत आंदोलनानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राजभवनात निवेदन दिले.

Web Title: 'We will continue to fight till farmers get justice' - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.