शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:10 AM2024-09-05T11:10:04+5:302024-09-05T11:14:05+5:30

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, काँग्रेस राष्ट्रवादी जे नाव देईल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान करत उद्धव ठाकरे सातत्याने आग्रहाची मागणी करत होते. 

We will discuss about the post of Chief Minister at any time, the people will decide the CM, Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut reaction to Sharad Pawar statement | शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

मुंबई - महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा. ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठेवले तर त्यातून पाडापाडी होते असं सांगत उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाष्य केले होते. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित व्हावा अशी ठाकरे गटाची मागणी होती मात्र त्याला शरद पवार आणि काँग्रेसनं स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आता ठाकरे गटाने मवाळ भूमिका घेत आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं आहे. मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा होऊ शकते असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या मनात जो चेहरा त्यालाच जनता मुख्यमंत्री बनवते. शरद पवारांचं विधान शतप्रतिशत ठीक आहे. तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी आहे. कोण किती जागा जिंकते त्यानंतर हे ठरवलं जाईल. परंतु महाविकास आघाडीला बहुमत मिळतंय. आमचं सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणं हे आहे. आम्ही मुख्यमंत्रिपदावर कधीही चर्चा करू शकतो असं त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा ही आग्रहाची मागणी काँग्रेस आणि शरद पवारांच्या भूमिकेनंतर सोडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

कोल्हापूरात पत्रकारांशी पवारांनी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले की, मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचं नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन केले.

Web Title: We will discuss about the post of Chief Minister at any time, the people will decide the CM, Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut reaction to Sharad Pawar statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.