ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. 18 : पालकमंत्र्यांऐवजी शेतकरी, कष्टकरी वा स्वातंत्र्यसैनिक यांना ध्वजारोहण करु द्यावे असे आवाहन आम्ही केले होते. हा देशद्रोह होय असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे.
काल मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समिती जीवाणू आहे, ती राष्टद्रोही आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी औरंगाबादचे सुकाणू समितीचे नेते पत्रपरिषदेत एकत्र आले. यावेळी कॉ. एच. एम. देसरडा, साथी अण्णा खंदारे, कॉ. उध्दव भवलकर, जनार्दन पिंपळे, कॉ. बुध्दप्रिय कबीर, मंगल ठोंबरे, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, अजमलखान आदींची उपस्थिती होती.
सुभाष लोमटे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करा असे म्हणणे कसा काय देशद्रोह ठरु शकतो. मग लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का? जनतेचे प्रश्न उपस्थित करणे हा देशद्रोह ठरणार असेल तर मग असा देशद्रोह आम्हाला रोज करावा लागेल. उलट दिलेली आश्वासने न पाळने हा देशद्रोह होय. पण असा आरोप आम्ही करु इच्छित नाही. पण लोकशाहीत तुम्हाला आम्ही जाब विचारणार...उत्तरे देण्याची जवाबदारी तुमची आहे. जाब विचारण्याचा आमचा अधिकार तरी हिरावून घेऊ नका.
सुकाणू समितीची ताकद नाही. नसेलही.मग मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घेण्याचीही गरज नाही. मग ते का घेतात? आम्ही शेतक-यांचा नेमका प्रश्न लावून धरतोय. या प्रश्नाची पुन्हा पुन्हा आठवण करुन देतोय, हेच त्यांना नकोय. रोज शेकतरी आत्महत्त्या करताहेत, मग किती शेतक-यांचा सातबारा कोरा झाला, हे तरी सांगा, असे आवाहन लोमटे यांनी केले.
लोमटे यांनी सांगितले की, ध्वजारोहण रोखण्याची आमची भूमिका नव्हती. आणि सुकाणू समितीतर्फे कुठेही ध्वजारोहण रोखले गेले नाही. सुकाणू समितीत विविध जनसंघटना आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी नाहीत. विरोधी पक्षाचे मत लोकशाहीत गाभा असतो, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.
जीवाणू उपयुक्त असतो. विषाणू बाधक असतो. सुकाणू समिती जीवाणू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी हा फरक जरा नीट समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देसरडा यांनी दिला. सध्याच्या सरकारची पाऊले छुप्या आणीबाणीकडे चालली आहेत. लोकशाहीचा संकोच होतोय, असे ते म्हणाले.