मुंबई - एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे पुण्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या धोरणावर आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, शरद पवार यांनी ज्यांच्यासोबत आघाडी केली, त्यांना त्यांनी संपवलं. त्यामुळे त्यांची साथ नको, मग आम्ही पराभूत झालो तरी बेहत्तर, आम्ही पुन्हा उभे राहू. ममता, केजरीवालांच्या मागे कुणी नाही, आपल्यामागे बाळासाहेब आहेत. चला मैदानात, आपण उभं राहू, नव्याने लढू, काही काळ लागेल, पण उभं राहू, मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे शक्य होणार नाही, राष्ट्रवादीला सोडून चालणार नाही, असा दावा आढळराव यांनी केला.
दरम्यान, गेल्या 15 वर्षे मी खासदार राहिलो आणि केवळ एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. एकनाथ शिंदेंना आमच्या अडचणी माहिती होत्या, निवडून येताना काय समस्या येतात याची जाणीव त्यांना आहे. मात्र, गेल्या 15 वर्षे या जिल्हयात मी खासदार होतो, मी शिवसेना जिल्ह्यातील गावाखेड्यात नेली वाढवली, येथील शिवसैनिकासाठी मी भांडतोय. पण, एका पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी केली, याची वेदना आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली.
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती.