लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो, त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. राजकारणात फार काळ एका व्यक्तीसोबत रहायचे नसते. आता मी पुढील १० वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाहीत. त्यानंतर हवा ज्या दिशेला वाहणार, तिकडे आम्ही जाणार! हवेची दिशा जाणून प्रवास केल्यासच राजकारणात टिकाव लागतो’, अशा मिश्किल शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय टिपण्णी करताच बालगंधर्व रंगमंदिरात हास्याचे फवारे उडाले. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित हास्य कवी संमेलनाचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, हास्यकवी बंडा जोशी, भरत दौंडकर, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते. ‘आपल्या देशात केल्यामुळे नोटबंदी, फारच परेशान दिसताहेत राहूल गांधी, देशात आलीये नरेंद्र मोदींची आंधी, त्यांनी तोडून टाकली काँग्रेसची फांदी’, ‘शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली, काँग्रेसची सत्ता गेली’ अशा कविता सादर करत आठवलेंनी वातावरणात हास्याचे रंग भरले.आठवले म्हणाले, ‘माझ्या पक्षाची ताकद लहान असली तरी आम्ही २९ राज्यात कार्यरत आहोत. गावागावात माझी कणसासारखी गोड माणसे काम करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे विचार घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.’
वारे वाहणार, तिकडे आम्ही जाणार - आठवले
By admin | Published: June 28, 2017 1:46 AM