तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : सवंग घोषणा करणाऱ्यांपैकी मी नाही, मी जे बोलतो ते करतो, असा टोला विरोधकांना लगावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणासुदीत नुकसानग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू, अशी घोषणा त्यांनी तुळजापुरात बुधवारी केली.तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, नुकसानीचा आढावा घेत आहे. पंचनामे पूर्ण होत आलेत. एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यानंतर लागलीच मदतीचा निर्णय जाहीर करु. तोपर्यंत धीर धरा, काळजी घ्या. तुम्हाला पुन्हा उभे करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही ठाकरे म्हणाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आदी उपस्थित होते.
शेतकऱ्याचा बांध फुटला...काटगाव येथील शेतकरी अरविंद माळी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली. यावेळी माळी यांचा बांधच फुटला़ ते रडतच म्हणाले, चार ते पाच फूट माती वाहून गेली आहे. घरातील लेकरांचे शिक्षण साहित्य भिजून गेले़ मीठ-मिरचीही शिल्लक राहिली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मदत पोहोच करु, अशी ग्वाही दिली.