Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तर प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा, मेळावे सुरु आहेत. याच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष विविध आश्वासन देत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे देखील मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी जुनी पेन्शन योजनेच्या महाअधिवेशनात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना आंदोलकांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमचं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो असं आश्वासन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलं.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. सत्ता येते-जाते. सत्ता येणार. गेलेली सत्ता मी खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना उपोषण करु नका अशीही विनंती केली. हे सरकार गेल्यात जमा, आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबियांची चिता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार आणि आपण खेचून आणणार. आता हे सरकार गेल्यात जमा आहे. त्यांना पेन्शन कसले त्यांना आता टेन्शन देण्याची वेळ आली आहे. आपण एकजूट राहण्याची गरज आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्याला एकजूट हेच उत्तर आहे. या एकजुटीमुळे हे सरकार गेल्यात जमा आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
"त्यामुळे पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नये. जनता आधीच उपाशी आहे. त्यामुळे आता उपोषण नको. सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवे, असे आपले आंदोलन हवे. अशा आंदोलनाचा निर्धार करा. आंदोलनाची मशाल पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका. जुनी पेन्शन योजना आपल्या सर्वांनी एकत्र येत, आपले सरकार आणत अंमलात आणायची आहे. तुमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे आता आपण सर्व येत आपले सरकार आणा, तुमची मागणी आपण मान्य करतो, हा माझा शब्द आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शम मिळते, ही तफावत तुम्ही पाहिली. सरकार तुम्ही चालवत आहात. कोरोना काळात तुम्ही काम केले म्हणून राज्य वाचले. योजना सरकार जाहीर करते पण ती घराघरांत जाऊन तुम्ही राबवता. तुम्ही साथ दिली नाही, तर कोणतेच सरकार राहू शकत नाही. आता लाडकी बहीण योजना आणली पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही. प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ, असे सध्या सुरू आहे," असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.