औरंगाबाद, दि. 17 : गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील 40 लाख लोकांना लाभ मिळाला, सिंचानाचा प्रश्न सोडवण्यासाठी धरणांची कामे केली तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते नियोजन केलं आहे. यासाठी दमणगंगा-पिंजाळच्या माध्यमातून मराठवाड्याला 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. यासाठी मान्यता दिली असून लवकरच एमओयूच्या माध्यमातून केंद्राकडे योजना जाईल व त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल. आम्ही मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मुक्ती संग्रामातील शहिदांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.भारतमाता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. पण भारतमातेचे काही पूत्र मात्र पारतंत्र्यात होते. त्यापैकी एक मराठवाडा. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणे त्याकाळात मोठे आव्हान होते. मराठवाड्यातील वीरांनी मोठा संघर्ष केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. थोर वीरांमुळेच आज आपण स्वतंत्र अनुभवतो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.