Ajit Pawar: "आम्ही कधी सत्तेत येऊन बसू कळणारही नाही’’, अजित पवारांचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 09:20 AM2022-10-03T09:20:11+5:302022-10-03T09:20:41+5:30
Ajit Pawar: जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला अनपेक्षितपणे सत्तेबाहेर जावे लागले होते. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे.
पुणे - जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला अनपेक्षितपणे सत्तेबाहेर जावे लागले होते. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असे अजित पवार म्हणाले.
एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्षे होतो. आमच्यातर्फे पवार साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. राज्यातील सत्ता होती. जिल्हा परिषद होती. एखाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. इतर संस्थाही ताब्यात होत्या. मात्र आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असे अजित पवार म्हणाले.
त्यानंतर मला कळलं की, यांनी जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला त्रास दिला, तर ते मी सहन करणार नाही. आमच्या लोकांचं काही चुकलं, अगदी मी चुकलो तरी कारवाई करा. कारण कायदा नियम सर्वांना सारखाच आहे. मात्र काही चूक नसताना, काही दोष नसताना केवळ कुणीतरी सत्तेत असणारा माणूस सांगतो, म्हणून कुणालातरी त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे, अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, ही बाब शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. हे संविधानाने कुणाला शिकवलेलं नाही. नियम, कायदे सर्वांना सारखे असतात, याची दखल सर्वांनी घ्यावी, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला.