Raj Thackeray Ramdas Athawale: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सरकार आल्यास मशिदींवरील भोंगे हटवू, अशी घोषणा केली. त्यावर बोलताना रामदास आठवलेंनीराज ठाकरेंना डिवचले. 'राज ठाकरेंचं सरकार येऊ शकत नाही. त्यांचा एक आमदार निवडून येतो, तोही स्वबळावर; राज ठाकरेंमुळे नाही', असे रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवलेंनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यांना राज ठाकरे यांनी भोंगे हटवण्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी विषमता, भ्रष्टाचार हटवण्याचं काम केलं पाहिजे, असे आठवले म्हणाले.
राज ठाकरेंचा एक आमदारही स्वबळावर निवडून येतो -रामदास आठवले
आठवले म्हणाले, "मला वाटतं राज ठाकरे वारंवार अशी विधानं करतात की, आमचं सरकार आल्यावर आम्ही मशिदींवरील भोंगे हटवू. पण, भोंगे असे हटवले जाऊ शकत नाही. राज ठाकरेंचं सरकारही येऊ शकत नाही. किती वर्ष गेली, तरी राज ठाकरेंचं सरकार येणं अवघड आहे. त्यांचा तर एक आमदार निवडून येतो. तोही स्वतःच्या बळावर निवडून येतो. राज ठाकरेंमुळे तो निवडून येत नाही."
"राज ठाकरेंचं सरकार कसं येईल? ते कसे भोंगे हटवणार? ते असेच भोंगे हटवू शकत नाही. मी जे दहशतवादी मुसलमान आहेत, त्यांचा विरोध केला आहे. पण, देशावर प्रेम करणारे मुसलमान आहेत. भारताच्या संविधानावर प्रेम करणारे मुसलमान आहेत. हिंदूंसोबत बंधुभाव दृढ करणारे मुसलमान आहेत. अशा मुसलमानांचा विरोध करणं योग्य नाही", अशी भूमिका रामदास आठवलेंनी मांडली.
राज ठाकरेंना रामदास आठवलेंनी काय दिला सल्ला?
"मशिदीमध्ये एक-दोन मिनिटांची अजान होते. त्यांचे भोंगे हटवण्याबद्दल ते का बोलत आहेत. भोंगे हटवण्यापेक्षा गरिबी हटवा. भोंगे हटवण्याऐवजी भ्रष्टाचार हटवा. भोंगे हटवण्याऐवजी मला असं वाटतं की, विषमता हटवली पाहिजे. ही कामं राज ठाकरेंनी केली पाहिजे", असा सल्ला आठवलेंनी राज ठाकरेंना दिला.
"1-2 लोक निवडून येतील की नाही, माहिती नाही"
"फक्त १३९-१४५ उमेदवार उभे केले म्हणजे खूप लोक निवडून येतील, असे नाही. १-२ लोक निवडून येतील की नाही, माहिती नाही. राज ठाकरेंनी असे विधान वारंवार करणं चांगले नाही. जर भोंगे काढण्याचा प्रयत्न केला, तर माझा पक्ष भोंगे हटवणाऱ्यांना धडा शिकवेन", असा इशारा रामदास आठवलेंनी दिला.