अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:03 PM2024-01-09T13:03:23+5:302024-01-09T13:42:19+5:30

गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता.

we will not take ajit Pawars group along again says Ncp chief Sharad Pawar | अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष टोकदार झाला असून अजित पवार गटाला आता माफी नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. "अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांबद्दल आता फेरविचार नाही," असं शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

दिल्लीतील भाजप सरकार गेलं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे की नाही मला माहीत नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला आहे त्यांच्याबाबत आमच्या पक्षात आता फेरविचार होणार नाही. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यास जे जबाबदार आहेत, त्यांच्याबाबत आमची भूमिका स्वच्छ आहे," असं म्हणत महायुतीत गेलेल्या गटाला शरद पवार यांनी फटकारलं आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती, प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

शरद पवार यांनी आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. "दिल्लीत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा होईल. या बैठकीत राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. जागावाटपाचं चित्र कसं असावं यावर ही बैठक होणार असली तरी ही अंतिम बैठक नाही. ही जागावाटपाच्या चर्चेची सुरुवात असून यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभागी करून घ्यावं, अशी आमची भूमिका आहे,' असं शरद पवार म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापे टाकले आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, साहजिकच जोपर्यंत दिल्लीचं सरकार बदल नाही, तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. 

दरम्यान, 'बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगारांना मिळालेला दिलासा कोर्टाने रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाने निकालात नमूद केलं आहे की यावर महाराष्ट्र सरकारनं निर्णय द्यावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वसामान्यांना आधार देणारा आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

Web Title: we will not take ajit Pawars group along again says Ncp chief Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.