हिंगोली - बबन थोरातला पुरून उरू, आमच्या गाड्या तुमच्या घरासमोर आणून उभ्या करू. आमच्या गाडीला टच जरी करुन दाखवलं तर हाच संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वात शेवटी सहभागी होणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा समावेश आहे. बांगर यांनी विधानसभेत अध्यक्षपदावेळी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. परंतु विश्वासदर्शक ठरावावेळी बांगर थेट शिंदे गटात सहभागी झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. विधानसभेच्या आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे १२ खासदारही एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचाही समावेश होता.
हिंगोलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर जोरदार निशाणा साधला. बबन थोरात म्हणाले की, ज्यांच्या कार्यक्षेत्रात गद्दारांची गाडी येईल. आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर केला जाईल. भामट्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करावा लागेल अशा शब्दात थोरात यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं.
अलीकडेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला आहे. बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. संतोष बांगर यांनी बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती.
बांगर म्हणाले होते की, स्वाभिमानाने जगा, असा सल्ला बंडखोर आमदारांना दिला. तर बंडखोरांचे काही चांगले होणार नाही. त्यांना नागरिक रस्त्याने फिरू देणार नाहीत. त्यांच्यावर सडके टमाटे, अंडे फेकतील. त्यांच्या तोंडाला काळे लावतील, असेही ते जोशात बोलण्याच्या ओघात बोलून गेले. एवढेच नव्हे, तर बंडखोरांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील. त्यांच्या लेकरांना कोणी मुली देणार नाही. ते मुंजे राहतील, असेही म्हटले होते.