पुणे : भाषणातील वादग्रस्त मुद्द्यांमुळे महामंडळाने भाषण न छापण्याचा निर्णय घेतला असल्याचा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेला आरोप फेटाळून लावत भाषणाची प्रत हातात पडण्यासच विलंब लागल्यामुळे इच्छा असूनही भाषण छापता आले नाही, असे सांगत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी भाषण न छापण्याला संमेलनाध्यक्षांनाच कारणीभूत ठरविले आहे. मात्र, अजूनही आम्ही संंमेलनाध्यक्षांचे भाषण छापू, असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिले आहे. संंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘आपले भाषण सेन्सॉर करण्याचा अधिकार महामंडळाला कुणी दिला?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर भाष्य करताना वैद्य बोलत होत्या. कोषाध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ‘‘सबनीस यांच्याशी शेवटपर्यंत संवाद कायम होता. एक कोषाध्यक्ष या नात्याने भाषण छापायला देण्याकरिता निधी पुरविण्याची जवाबदारी माझी आहे. पण, तशा कोणत्याच सूचना मला देण्यात आल्या नव्हत्या. सबनीसांनी तरीही महामंडळाला न विचारता परस्पर भाषणाच्या प्रती वाटल्या, हे योग्य होते का? संंमेलनाध्यक्षांचे भाषण ही महामंडळाची प्रॉपर्टी आहे. आत्तापर्यंत दोन्ही संमेलनाध्यक्षांची भाषणे छापली आहेत, तेव्हा कोणताच प्रश्न उपस्थित झाला नाही.’’ (प्रतिनिधी)
संमेलनाध्यक्षांचे भाषण आम्ही छापू
By admin | Published: January 22, 2016 12:51 AM