पाथर्डी (जि. अहमदनगर) : आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या. मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण पुढील २५ वर्षे आम्हीच सत्तेवर राहाणार आहोत. १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरीही पाहिली. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. ईव्हीएममुळे हरलो असा आरोप ते करतात. मात्र ईव्हीएममुळे नव्हे तर त्यांना जनतेने हरविले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
महाजनादेश यात्रेत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांना जनता मते देण्यास तयार नाही. राष्टÑवादी व कॉँग्रेसनेही यात्रा सुरू केल्या. परंतु त्यांचा १५ वर्षांचा काळ जनतेने पाहिला आहे. त्यामुळे जनता त्यांच्याबरोबर जाणार नाही. विरोधी पक्षांची अवस्था बुद्धू पोरांसारखी झाली आहे. अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून कारणे द्यायची. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.मुख्यमंत्र्यांनी घेतला कौलव्यासपीठावर जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी आमदार होते. यावेळी त्यांना जनादेश देणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी सभेला विचारला. त्यावेळी उपस्थितांनी हात वर करून मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिला. बबनराव पाचपुते, दिलीप गांधी, मोनिका राजळे, राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांची नावे मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली.