भंडारा - Mahadev Jankar on BJP ( Marathi News ) आम्ही भाजपासोबत होतो तेव्हा आमचे प्राबल्य होते, त्यापेक्षा दुप्पट प्राबल्य आता वाढलेले आहे. त्यावेळी माझे २३ नगरसेवक होते. आता माझ्याकडे ९८ नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहे. भाजपा मित्रपक्षाचा, छोट्या पक्षाचा वापर करते आणि फेकून देते हे त्यांचे जुने धोरण आहे. मला राजू शेट्टी, रामदास आठवले यांना भाजपाने जवळ केले. परंतु मोठे नेते आल्यानंतर त्यांना छोट्या माणसांची गरज राहत नाही अशी नाराजी माजी मंत्री आणि रासप प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रासपाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले की, भाजपा आणि काँग्रेस दोन्हीही छोट्या पक्षांचा वापर करतात. लोकसभा निवडणुकीत आमची ताकद त्यांना कळेल. छोटा पक्षही मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो हे कालांतराने भाजपाला जाणीव होईल. आज आमची ताकद वाढलेली आहे. भाजपा-काँग्रेस महल आहे. आम्ही झोपडीतून आता बंगल्यात आलोय. महाराष्ट्रातील ७२ हजार पोलिंग बुथवर आम्ही सक्रीय आहोत. आमची ताकद वाढवण्यासाठी अहोरात्र मी फिरतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच नागपूर, चंद्रपूर दौरा झाला. राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. आम्ही हळूहळू भाजपाचा जो आधार आहे तो बाजूला करण्याचं प्लॅनिंग शिस्तबद्ध पद्धतीने करत चाललोय. आज जरी भाजपाची मोठ्या प्रमाणात सत्ता असली तरी आम्ही २० वर्षापूर्वी दगड उभा केला तरी काँग्रेस निवडून येत होते. तेव्हा आम्ही काँग्रेसविरोधात लढत होतो. काँग्रेसला माणूस मिळणार नाही असं म्हणत होतो. आज तीच काँग्रेसची व्यथा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील भाजपा कशी विस्मृतीत जाईल यासाठी लागणारी भूमिका रासप घेईल असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.
दरम्यान, बारामती ही माझी युद्धभूमी आहे. जर मी इतर मतदारसंघात उभा राहिलो असतो तर मला जास्त कुणी विचारले नसते. बारामतीच्या जनतेच्या मनात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष उभा आहे. सुप्रिया सुळे असेल किंवा सुनेत्रा पवार असेल ज्याच्या पारड्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद जाईल तोच बारामतीचा खासदार बनेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.