सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हयातील सिंचन योजनांची कामे सध्या गतीने सुरू आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे. केंद्राच्या मदतीमुळे जिल्हयातील पाणी योजनांचे काम अभूतपूर्व झाले असून, २०१९ अखेर सर्व योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.
विविध विभागांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सांगली दौऱ्यावर होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्हयातील विकासकामांवर खर्च केलेल्या निधीचा ताळेबंद व भविष्यातील विकासकामांचे नियोजन मांडले.
मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हयातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अपूर्ण असलेल्या पाणी योजना पूर्ण करणे गरजेचे आहे. पूर्वी कधीही झाली नव्हती इतकी कामे गेल्या तीन वर्षांत झाली आहेत. ‘प्रधानमंत्री सिंचाई योजना’ आणि ‘बळीराजा’ योजनेमुळे अत्यंत वेगाने कामे पूर्णत्वास येत आहेत. टेंभू योजनेतून जिल्'ाला विशेष फायदा होणार असून, येत्या मार्चपर्यंत पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योजनांच्या कामांना निधीची कमतरता भासू दिली नसल्याने कामे वेगाने पूर्ण होत आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे, तर याचवर्षी त्यात वाढ करून ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार आहे.
ते म्हणाले की, ५०० किलोमीटर लांबी असलेल्या योजनांची ३४५ किलोमीटरवरची कामे प्रगतीपथावर आहेत. टेंभूच्या आराखड्यामध्येही बदल केल्याने योजनेवरचा खर्च ७०० कोटींनी कमी होणार आहे. दीड वर्षात जत तालुक्यातील दोन व कवठेमहांकाळ तालुक्यातील एक अशा तीन लिफ्टचे काम पूर्ण करत मार्चअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडून सुरू असलेल्या कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.‘वाकुर्डे’ला ३० कोटी दिले, आखणी ५० कोटी देणारशिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पूर्णत्वासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेसाठी १०० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अजून ५० कोटी रुपये देण्यात येणार असून, काम पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.