मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून, महापालिकेला मुंबईकरांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अनेक वेळा अशी फजिती झाल्याने, पालिकेच्या उच्चपदस्थ समितीने अखेर हवामान खात्याला कानपिचक्या दिल्या आहेत. हवामानाचा अंदाज स्थळ, काळ आणि प्रमाण सापेक्ष असण्याबरोबरच, मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तविण्याची सूचना महापालिकेने केली आहे.मुंबईत २९ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शंकर लक्ष्मण मटकर मार्गावर तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल उघडण्यात आले होते. या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला.या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या समितीने, आपला अहवाल पालिका आयुक्त अजय मेहता यांना आज सादर केला. या अहवालात हवामान खात्यालाही पालिकेने सूचना केल्या आहेत.हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात येणारे अंदाज हे अनेकदा परिमाणवाचक व क्षेत्र-तपशील त्यात नसते, तसेच ते ढोबळमानाने वर्तविलेले असल्याने, आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी ही अनेक वेळा गरजेपेक्षा जास्त किंवा कधी कमी केली जाण्याचा धोका असतो. त्यामुळे हवामान खात्याने आपले अंदाज हे अधिक ‘स्थल-काल-प्रमाण’ सापेक्ष वर्तवावेत, ज्यामुळे याबाबत आवश्यक ती आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करणे शक्य होईल, अशी सूचना या अहवालातून करण्यात आली आहे.अहवालात उल्लेख: हवामान खाते मुंबई व कोकणसाठी एकत्रित अंदाज वर्तविते. त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा. मुंबईसाठी अंदाज वर्तविताना, त्यामध्येदेखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल. या अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल, असे या अहवालात म्हटले आहे.
हवामान खात्याला महापालिकेच्या कानपिचक्या, आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करता येणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:26 AM