मुंबई : अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळानंतर मान्सून पुढे सरकेल आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र काबीज करत, पुरेशा पावसाची बरसात करेल, असे हवामान खात्याने वर्तविलेले या मोसमातील सगळे अंदाज अक्षरश: खोटे ठरत आहेत. हवामान खात्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्याही संकटात आल्याने हवामान खाते आणि बियाणे कंपन्यांचे साटेलोटे तर नाही ना, अशी आगपाखड केली जात आहे.
जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन होईल. आगमनानंतर पाऊस लागून राहील, असे अंदाज हवामान खाते आठवड्याभरापासून देत आहे. प्रत्यक्षात मात्र मान्सून दाखल होण्यास विलंब होत असून, आता २३ जून उजाडला, तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. परिणामी, मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे हवामान खात्याच्या नावाने बोटे मोडली आहेत. मुंबईतल्या उकाड्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढले असून, मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट पाहत आहे. शुक्रवारी सकाळी तुरळक पडलेल्या पावसानेही दिवसभर उघडीप घेतल्याने मुंबईकर उन्हाने आणि उकाड्याने हैराण झाले होते.
मान्सून लेट कारण...बिपोरजॉय चक्रीवादळामुळे आता मान्सूनसाठी हवामान अनुकूल होण्यास वेळ लागतो आहे. हवामान अनुकूल असले, तरी काही कारणांमुळे मान्सूनची प्रगती खुंटते. हवामान खाते निरीक्षणे नोंदविते आणि अंदाज देते. एखाद्या ठिकाणी मान्सून दाखल झाला, तरी सलग दोन दिवस आणि २.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याचे घोषित केले जाते. आता रविवारपासून पाऊस होण्यास सुरुवात होईल.- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.
आता कुठे आहे मान्सून?विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत हवामान अनुकूल आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.