Maharashtra Weather Forecast ( Marathi News ) : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी हवामान अंदाज वर्तवला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत कसं असेल हवामान?
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २८ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.