- श्रीकिशन काळे पुणे - हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली. या पावसाला अवकाळीदेखील म्हणता येणार नाही, गारा पडल्याने हा हवामान बदलाचा फटका असल्याचे म्हटले आहे. परंतु, तसे काहीही नसून या काळात अशी परिस्थिती असते, असे डाॅ. केळकर म्हणाले.
परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह भिडतात तेव्हा...- भारत उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, उत्तरेकडील प्रदेश शीत कटिबंधात मोडतात. उष्ण कटिबंधावरचे वारे सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, शीत कटिबंधावरचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. - क्वचितप्रसंगी असे घडते की, हे परस्परविरोधी प्रवाह महाराष्ट्रावर एकमेकांना भिडतात. मग एकीकडची शीत व शुष्क हवा आणि दुसरीकडची उष्ण व दमट हवा यांची देवाणघेवाण होते आणि महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपीट होते.
गारा पडण्याची प्रक्रियाजमिनीपासून जितके वरती जावे तितके हवेचे तापमान कमी होत जाते. समजा, जमिनीचे तापमान ३० अंश सेल्सिअस आहे, तर मग ५-६ किमी उंचीवर हवेचे तापमान शून्य सेल्सिअस राहते. आता या स्तरावर असलेल्या ढगातील जलबिंदूचे घनीभवन होऊन त्यांचे सूक्ष्म हिमकणांत रुपांतर होते, असे हिमकण असलेले क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग आकाशात खूप उंच वाढतात.वारे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी म्हणजे आडवे वाहतात. परंतु, वातावरणात असेही काही तरंग असतात जे उभे वाहतात; क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगात हे उभे किंवा उर्ध्वाधर तरंग खूप प्रबळ असतात. त्याच्यात बनलेले हिमकण या तरंगांमुळे वर फेकले जातात. त्यांच्याभोवती आणखी बाष्प जमा होते, ते मोठे होतात आणि परत खाली पडतात. हिमकण जर पुन्हा पुन्हा वर खाली करत राहिले तर त्यांच्यावर बर्फाचे थर चढत जातात आणि त्यांचा आकार आणि वजन वाढते. अखेरीस ते पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षामुळे खाली पडू लागतात आणि शेवटी जमिनीवर आदळतात तेव्हा त्यांना आपणगारा म्हणतो.
शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके ज्वारी, बाजरी आदी घ्यावीत. आता डाळिंबे, द्राक्ष, ऊस लावला जातो नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीचे आहे. गारपीट होतेच. शेतकऱ्यांनी हवामान कधी कोणते असते, ते ओळखून पिके घ्यावीत. - डॉ. रंजन केळकर, हवामानतज्ज्ञ