पूजा दामले, मुंबईअवैधरीत्या सुरू असलेल्या आॅनलाइन औषधविक्रीतून भविष्यात आत्महत्या किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात, अशी भीती अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच आॅनलाइन औषधविक्री एफडीएने अत्यंत गांभीर्याने घेत ती रोखण्यासाठी विशेष सेलही स्थापन केला आहे.आॅनलाइन शॉपिंग साइट्सनी सुरू केलेल्या औषधविक्रीला प्रतिसाद का मिळतो, या प्रश्नावर एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मुळात या पद्धतीने औषध विकत घेण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन आवश्यकता नाही. त्यामुळे अन्य औषधांसोबत झोपेच्या गोळ्या, गुंगी आणणारे कफ सीरप सहजरीत्या कोणाच्याही हाती पडू शकतात. प्रत्यक्षात अशी औषधे डॉक्टरच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय ग्राहकाला देणे गुन्हा आहे. अशी औषधे हातात पडल्यास त्यातून गुन्हा घडू शकतो. तरुण मुले अशा औषधांचा नशेसाठी सहज वापर करू शकतात. औषधांची आॅनलाइन खरेदी केल्यास ती दहा ते पंधरा टक्के स्वस्त मिळतात, हेही महत्त्वाचे कारण असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आॅनलाइन साइट्सवर विकली जाणारी औषधे ही प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जातात. हे कायद्याचे उल्लंघन आहेच, पण त्याचा दुष्परिणाम असा की स्वत:च्या मनाने औषधे घेण्याची वृत्ती वाढेल. असे झाल्यास कालांतराने शरीरावर औषधांचे परिणाम होणार नाहीत. त्यामुळे आॅनलाइन औषधविक्रीला आळा घालणे अत्यावश्यक बनले. त्यासाठी ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डासमोर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच अन्य राज्यांमधल्या एफडीए आयुक्तांना पत्रव्यवहार करून आॅनलाइन औषधविक्रीबाबत सतर्क करण्यात आले आहे, असे महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.