राज्याच्या राजकारणात सध्या शिंदे आणि ठाकरेंमध्येच शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावरून जुंपली आहे. शिवसेनेत दोन उभे गट पडल्याने कालच्या दसरा मेळाव्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेली लढाई उद्या निवडणूक आयोगामध्ये रंगणार आहे. असे असताना राज्यात आणखी एका कारणासाठी शिंदे-ठाकरे नावे चर्चेत आली आहेत.
ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा होणार आहे. खूप लांब नाही, येत्या ८ तारखेचाच मुहूर्त आहे. महत्वाचे म्हणजे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी गटतट विसरून या लग्नाला हजेरी लावणार आहेत. या लग्नाची पत्रिकादेखील दसऱ्यापासून व्हायरल झाली आहे.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हे लग्न आहे. या पत्रिकेने पुण्याचेच नाही तर राज्याचे लक्ष वेधले आहे. एकीकडे राजकारणात शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असताना या शिंदे आणि ठाकरे कुटुंबात दिलजमाईचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. ही पत्रिका पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत.
वडगावसहाणी गावातील शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांचा मुलगा विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावची कन्या अनुराधा ठाकरे यांचा विवाह येत्या ८ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेतील वर्चस्वावरून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकाच घरातील व्यक्ती या दोन गटांत विखुरले गेले आहेत. परंतू, लग्नसोहळा असल्याने ठाकरे, शिंदे गट विसरून शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक या लग्नाला आवर्जून जाणार आहेत.