मुंबई : राज्यातील वजनकाटे दुरुस्त करणाऱ्या परवानाधारक दुरुस्तकांनी १ मार्चपासून वजन काट्यांची दुरुस्ती थांबवण्याचा इशारा दिला आहे. वैध मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांनी काढलेले निर्देश कायद्याविरोधात असून, त्यामुळे दुरुस्तकांना काम करणे कठीण झाल्याचा महाराष्ट्र राज्य वजने-मापे परवानाधारक संघटनेने केला आहे. दुरुस्तकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात मोर्चाही काढला.गेल्या तीन पिढ्यांपासून परवानाधारक दुरुस्तक कोणतेही वजन, काटा, माप दुरुस्तीचे काम करीत आहेत. मानक दुरुस्त केल्यानंतर ते व्यापाऱ्याला परत करण्याआधी त्याची फेरपडताळणी आणि मुद्रांकन शुल्क भरणे दुरुस्तकांना बंधनकारक असल्याचा संघटनेचा दावा आहे. मात्र वैध मापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी केंद्रीय वैधमापन शास्त्र कायदा २००९ आणि महाराष्ट्र वैध मापनशास्त्र नियम २०११ या कायद्यांविरोधात जात फेरपडताळणी आणि नोंदणी शुल्क दुरुस्तकांनी भरू नये, असे निर्देश दिले आहेत. शिवाय शुल्क भरणाऱ्या दुरुस्तकांविरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वजनकाटे दुरुस्त करून शुल्क भरले नाही, तर कारवाईची भीती दुरुस्तकांत निर्माण झाल्याचे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गिरजाकांत उपाध्याय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वजन काट्यांची दुरुस्ती थांबवणार!
By admin | Published: February 25, 2015 2:40 AM