मुंबई : भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते फक्त ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची गाडी सुसाट निघाली असून सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.‘आमच्या पक्षात काय चालले आहे कळतच नाही, आपलेच सरकार येणार असे आम्हाला सांगितले जात आहे पण नेमके काय चालले आहे. सरकार खरेच येणार असेल तर त्यासाठी दिल्लीतील भाजपश्रेष्ठी काही हालचाली करीत असल्याचे निदान दिसत तरी नाही’, अशी भावना भाजपच्या काही आमदारांनी व्यक्त केली.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा काहीतरी नक्कीच करतील आणि आपले सरकार येईल’, असा आशावाद भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे आमदारांनादेखील आहे. पण त्या दृष्टीने काही हालचाली श्रेष्ठींकडून होत असल्याचे आमदारांपर्यंत पोहोचत नसल्याने निराशादेखील आहे.महाराष्ट्राच्या अनुषंगाने भाजपची सर्व प्रकारची राजकीय सूत्रे ही मोदी-शहांनी हातात घेतली आहेत. त्यामुळे आता जे काही होईल ते वरूनच होईल, असे राज्यातील नेते सांगत आहेत. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य सहज हातून जाऊ दिले जाणार नाही, हा आशावाददेखील त्यांना आहे.सूत्रांनी सांगितले की भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे प्रत्येक राजकीय हालचालींबाबत समन्वय साधून आहेत.
‘वेट अॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:32 AM