कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणाऱ्या मडगाव ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार थांबा दिल्यानंतर या राजधानी एक्स्प्रेसचे कुडाळ रेल्वे स्थानकात कुडाळ तालुका भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित असलेले खासदार विनायक राऊत यांनी या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणाऱ्या मडगाव ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी कुडाळ तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार प्रभु यांनी या एक्सप्रेसला कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे आदेश दिले होते. सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार या एक्स्प्रेसला कुडाळ येथे थांबा देण्यात आला असून या एक्स्प्रेसच्या पहिल्या फेरी दरम्यान कुडाळ रेल्वे स्थानकात कुडाळ तालुका भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार शिवराम दळवी, नियोजन सदस्य काका कुडाळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, भाजपचे तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, भाजप कुडाळ शहर अध्यक्ष अजय शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, बंड्या सावंत, नीलेश तेंडुलकर, सदानंद अणावकर, जालीमसिंह पुरोहीत, कोकण रेल्वे कोकण परीक्षत्राचे बाळासाहेब निकम तसेच भाजप व शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या एक्स्प्रेसला पुष्पहार घालण्यात आला. तसेच रेल्वे चालकांना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ही रेल्वे आठवड्यातून रविवार व सोमवार असे दोन दिवस धावणार असून दिल्लीहून ही रेल्वे सकाळी १0.५५ वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता कुडाळ येथे येणार तर मडगावहून ही रेल्वे दिल्लीला जाण्यासाठी सकाळी १0.0५ वाजता सुटणार व कुडाळला सकाळी ११.४0 वाजता येणार व दिल्लीला दुसऱ्या दिवशी १२.४0 वाजता पोहचणार आहे. ही रेल्वे सुपर फास्ट असून या रेल्वेला मडगाव, थिवीम, कुडाळ, पनवेल असे थांबे आहेत. दिल्लीला जाणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसला कुडाळ स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे कुडाळवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
राजधानी एक्स्प्रेसचे कुडाळमध्ये स्वागत
By admin | Published: November 15, 2015 11:11 PM