शौकत शेख,
डहाणू : पालघर जिल्हातील दांडी येथून दरवर्षी प्रमाणे अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी पदयात्रा निघाली आहे. दांडी-अजमेर हे १ हजार १५० कि.मी. अंतर ही यात्रा पायी पार करणार आहे. हिंदु-मुस्लीम बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या यात्रेत पाच मच्छीमार सहभागी असून त्यांचे दांडी, तारापूर, चिंचणी, डहाणू या ठिकाणी स्वागत झाले.विश्वनाथ दवणे रा.दांडी, संतोष तांडेल, मिथुन पाटील, मोरेश्वर तामोरे, गणेश पाटील या पदयात्रींचे पालघर जिल्हयाचे मुस्लिम नेते शिम पीरा यांनी स्वागत करु न शुभेच्छा दिल्या. यंदाचे त्यांचे अजमेर पायी जाण्याचे तिसरे वर्ष असून दररोज. किमान ५५ कि.मी. अंतर पायी जाऊन २१ दिवसात अजमेरला पोहचण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे दवणे यांनी सांगितले. या मच्छिमार पदयात्रींचे पालघर जिल्हयात सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच मदतीचे हातभार मिळत आहेत. दरम्यान अजमेर येथे तीन दिवस आणि राजस्थान येथील दुर्गाडी मातेच्या मंदिरात त्यांचा मुक्काम राहणार आहेत.