कल्याण - कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बिर्ला कॉलेज येथील रिक्षा स्टॅण्डवर अबोली रिक्षा चालविणा-या महिला रिक्षा चालकाला रिक्षा चालकांनीच मारहाण केली आहे. तिला सोडविण्यासाठी आलेल्या तिच्या पतीलाही मारहाण करुन रिक्षाची तोडफोड केल्याची घटना काल शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तीन रिक्षा चालकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण आरटीओ कार्यालयाने अबोली रंगाच्या महिला रिक्षा चालक असलेल्या रिक्षांना परवाने दिले होते. त्यापैकी जवळपास सात महिलांनी रिक्षा घेऊन चालविण्यास सुरुवात केली होती. कल्याणमध्ये दोन महिला रिक्षा चालक चालवितात. बिर्ला कॉलेज परिसरात राहणा:या शारदा प्रवीण ओव्हाळ या रिक्षा चालवितात. त्या बिर्ला कॉलेज रिक्षा स्टॅण्ड येथून रिक्षाचा व्यवसाय करतात. त्याठिकाणी असलेल्या रिक्षा चालकांकडून नेहमीच त्यांच्या रांगेतली रिक्षाच्या पुढे रिक्षा लावली जाते.
रांग तोडून त्यांना मागे टाकले जाते. अन्य पुरुष रिक्षा चालक रिक्षा भाडे भरण्यात आघाडी घेतात. या गोष्टीला शारदा यांनी मज्जाव केला. या गोष्टीचा राग मनात धरुन अन्य पुरुष रिक्षा चालकांनी तिला मारहाण केली. तिने मदतीसाठी तिचे पती प्रवीण यांना बोलावून घेतले असता शारदा व तिच्या पतिलाही मारहाण करण्यात आली. तिच्या रिक्षाचीही तोडफोड करण्यात आली. ही घटना काल रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शारदाने तिच्या पतीसह महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मारहाण व तोडफोड केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचा परवाना दिला. त्याचबरोबर महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा. त्यासाठी चालकही महिला असावा. या उद्देशाने अबोली रिक्षा सुरु झाली. ठाण्यात तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कल्याणमध्ये अबोली रिक्षावरील महिला रिक्षा चालकांना पुरुष रिक्षा चालक स्विकारण्यास तयार नाहीत. कल्याणमध्ये महिला रिक्षा चालकच असुरक्षित असतील तर महिला प्रवासी कशा काय सुरक्षित राहणार असा रास्त सवाल रिक्षा चालक शारदा यांनी उपस्थित केला आहे.