ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदावरुन हटविल्यानंतर संघवर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे संतापलेल्या गोव्यातील संघ पदाधिका-यांनी सामुहिक राजिनामा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही फूट टाळण्यासाठी संघाने तातडीने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वेलिंगकर यांची भाजपाविरोधातील पावलांमुळे उचलबांगडी करण्यात आली नसून त्यांना संघ परंपरेनुसार जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. गोव्यात संघ ‘बीबीएसएम’ला पाठिंबा देतच राहणार आहे, अशी आता संघाने भुमिका घेतली आहे.
शिक्षणाच्या माध्यम प्रश्नावरून ‘बीबीएसएम’च्या बॅनरखाली सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील भाजप सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची ‘बीबीएसएम’ची मागणी आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत निवडणूकादेखील लढविण्याची तयारी चालवली होती. यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संघाच्या केंद्रीय नेत्यांकडे वेलिंगकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी मनधरणी केली होती.यानंतर वेलिंगकर यांची संघचालकपदाची सूत्रे संघाकडून काढून घेण्यात आली. परंतु यामुळे गोव्यातील संघवर्तुळात खळबळ माजली व गोवा संघ कार्यकारिणीतील अनेक जण वेलिंगकर यांच्या पाठीशी उभे राहिले.
अशाप्रकारे संघातच फूट पडत असल्याचे दिसून येत असताना केंद्रीय पातळीवरुन तातडीने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. वेलिंगकर यांची उचलबांगडी करण्यात आलेली नाही. त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. वेलिंगकर यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. संघ राजकारणात सक्रिय नाही व नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेत संघाची कुठलीही भुमिका नाही. संघाच्या परंपरेनुसार त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आले आहे. परंतु ते संघाचे स्वयंसेवक आहेत व राहतील.
गोव्यात मातृभाषेला प्राधान्य हवेच
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे ही संघाची अगोदरपासूनची भुमिका आहे. देशाच्या सर्वच भागात यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. याच मुद्द्यावर गोव्यात ‘बीबीएसएम’तर्फे जे आंदोलन सुरू आहे. संघाने अगोदरदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे व यापुढेदेखील या आंदोलनात संघ ‘बीबीएसएम’सोबतच असेल. गोव्यात मातृभाषेला प्राधान्य दिलेच पाहिजे.
-डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ