"वावड्या आणि रेवड्या! बरे झाले, अजित पवारांनी हे कारस्थान उधळून लावले", सामनातून भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:18 AM2023-04-19T09:18:56+5:302023-04-19T09:19:45+5:30

धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले, अशा शब्दात संजय राऊत यांनी सामानातून भाजपवर निशाणा साधला आहे.

Well done, Ajit Pawar has foiled this conspiracy, targets BJP from the Saamana | "वावड्या आणि रेवड्या! बरे झाले, अजित पवारांनी हे कारस्थान उधळून लावले", सामनातून भाजपवर निशाणा

"वावड्या आणि रेवड्या! बरे झाले, अजित पवारांनी हे कारस्थान उधळून लावले", सामनातून भाजपवर निशाणा

googlenewsNext

मुंबई : भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले, अशा शब्दात संजय राऊत यांनी सामानातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयास पूर्णविराम मिळाला आहे, असेही म्हटले आहे.

आज आपण वावड्या आणि रेवड्या उठवण्यात आघाडीवर आहोत. अजित पवार हे नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादीला 'रामराम' ठोकून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत सहभागी होतील व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशा वावड्या उठवल्याने राज्यात म्हणे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार, सगळं वातावरण ढवळून निघणार वगैरे चर्चांना उधाण आलं, पण असे प्रत्यक्ष उधाण कुठे दिसेल तर शपथ! अजित पवार हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत व पक्षाचे बरेचसे काम तेच पाहतात. त्यामुळे वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे, असे सामनातून म्हटले आहे. 

याचबरोबर, भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे हे एक गमतीशीर गृहस्थ आहेत व त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणूनच पाहावे लागेल. आता बातमी आली की, महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या भाजप नेत्यांना दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने बोलावले. आता हे महत्त्वाचे नेते कोण, तर बावनकुळे व आशीष शेलार म्हणजे अजित पवारांसारखा बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपात प्रवेश करतोय आणि त्याबाबत चर्चा करायला कोण दिल्लीत जात आहेत, तर हे दोन 'वेलदोडे'. तेव्हा कोणत्या वावड्या किती गांभीर्याने घ्यायच्या? स्वतः अजित पवार म्हणतात, "मी कुठेच नाही व जात नाही.” तरीही भाजपपुरस्कृत माध्यमे अजित पवारांना पुनः पुन्हा जात्यात घालून भरडत आहेत,असे सामनातून म्हटले आहे.

"भाजपसाठी 'शिंदे' गट हे आता बिनकामाचे ओझे"
दुसरी गंमत अशी की, श्री. मिंधे व त्यांच्या लोकांनी पक्ष सोडताना अजित पवारांवर आरोप केले. अर्थमंत्री असलेल्या पवारांनी निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना डावलले, अजित पवारांमुळे शिवसेना फुटली वगैरे आरोप या मंडळींनी तेव्हा केले. मात्र आज तेच वेगळय़ा भूमिकेत आहेत. पुन्हा ढोंगबाजी अशी की, अजि पवार भाजपबरोबर आले तर त्यांच्या स्वागताचे बॅण्ड वाजवायला हे 'फुटके' व 'फुकटे' तयारच आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष अनेकदा फुटला व त्या राखेतून त्यांनी पुन्हा पक्ष उभा केला हे महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेना आमदारांचा गट भाजपने पडला, पण ते शिवसेना संपवू शकले नाहीत. शिवसेना जागेवरच आहे व राहील. सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले, पण भाजपसाठी 'शिंदे' गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरू आहे, अशा शब्दात सामनातून एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

"भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही"
आश्चर्य असे की, कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजपअंतर्गत सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पडून स्वतःचे घर भरायचे. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले",अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Web Title: Well done, Ajit Pawar has foiled this conspiracy, targets BJP from the Saamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.