एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहेत. या लाटा आता काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. याचा थेट फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. आज लोकसभा निवडणूक झाली तर त्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला त्या खालोखाल जागा मिळताना दिसत आहेत.
इंडिया टीव्हीने मूड ऑफ नेशन्स हा सर्व्हे केला आहे. यानुसार राज्यात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला २६ जागा, शिंदे गटाला ११ आणि शिवसेनेला ३, राष्ट्रवादीला ६ आणि काँग्रेसला २ जागा दाखविण्यात आल्या आहेत. ठाकरे शिंदेंना गद्दार म्हणत असले तरी सर्व्हेनुसार लोक शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पसंत करत असल्याचे दिसत आहे.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया इंडिया टीव्हीला दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदी विकासकामांना गती देत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी पहिल्यांदा देशाला सुरक्षित करण्याचे काम केले आहे. काश्मीर हातातून सुटेल असे काही जण सांगत होते, त्यांनी तेथील कलम ३७० हटविले. आमचे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे देखील ते स्वप्न होते. आज जर ते हयात असते तर खूप खूश झाले असते, असे शिंदे म्हणाले.
आमच्या सरकारला एक महिना होणार आहे. लोकांचे हे प्रेम आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी जनतेची मागणी होती. आम्ही येताच पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपये कमी केले, असे शिंदे म्हणाले.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे नेत आहोत. हे लोकांनी स्वीकारले आहे, त्यामुळे सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत आहे. कोणालाही कमी दाखवण्याचा आमचा स्वभाव नाही. आम्ही काम करू आणि आमची रेष पुढे नेऊ. कोणाची रेघ पुसण्याचे काम करणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.