लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.धापेवाडा टप्पा १ व टप्पा २ च्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.७) तिरोडा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीेला जि.प.सदस्या विमल नागपुरे, कैलाश पटले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, कृऊबास संचालक चतूरभूज बिसेन, डॉ. वसंत भगत, भाजप उपाध्यक्ष मनोहर बुध्दे, कार्यकारी अभियंता छप्परघरे, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, गायकवाड व लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांची बैठक बोलावून खैरबंदा जलाशयात सध्या स्थितीत ७.०० दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४४ टक्के आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी व्हावा, यासाठी खैरबंदा जलाशयात पाणीसाठ्याचे पूर्ण संचय करणे आवश्यक आहे. खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रं. १ च्या खैरबंदा उर्ध्वनलिकाद्वारे वैनगंगा नदीचे पाणी उपसा करुन १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश दिले.धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. सन १९९५ पासून या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आ. रहांगडाले यांच्या कार्यकाळात धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रं. १ पूर्णत्वास आली. या उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी १५ आॅगस्ट २०१७ ला यशस्वी चाचणी घेण्यात आली. परंतु उपसा सिंचनातील काही तांत्रीक बिघाडीमुळे चारही पंप सुरु नसल्यामुळे पूर्णपणे खैरबंदा जलाशयात पाणी भरता आले नाही. त्यामुळे त्वरीत पंप दुरुस्ती करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी दिले होते. त्यानंतर चारही पंप दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे या योजनेचे पाणी खैरबंदा जलाशयात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपट्टीच्या दराबाबत सर्व ग्रामपंचायतीनी शेतकºयांना नोटीसद्वारे माहिती द्यावी. सर्व शेतकºयांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी असे आ.रहांगडाले यांनी बैठकीत सांगितले.