वसई : श्रद्धा वालकर हिच्या देशभर गाजलेल्या हत्या प्रकरणानंतर आता दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. मुलीने आपल्या इच्छेविरोधात परधर्मातील मुलाशी प्रेम केल्यामुळे नाराज झालेले श्रद्धाचे वडील, तिच्या आईच्या इच्छेमुळे आरोपी आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले होते, मात्र आरोपीच्या लहान भावाने त्यांना घरात घेतले नव्हते, असे आता उघड होत आहे.
श्रद्धाच्या आईला आपल्या मुलीचे लग्न व्हावे असे वाटत होते. मात्र श्रद्धाने परधर्मातील मुलाबरोबर केलेले प्रेम आई-वडिलांना आवडले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी तिच्या या प्रेमाला विरोध केला होता. परंतु श्रद्धाने आफताबवरील प्रेमापोटी आई-वडिलांचे घर सोडल्यानंतर आई आजारी पडली होती. आपण हयात असेपर्यंत आपल्या मुलीचे लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. यामुळेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी माघार घेऊन ते आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांची पत्नी आणि मेहुणी त्यांच्यासोबत होती.
वालकर हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी वसईत आफताबच्या घरी गेले होते, तेव्हाची घटना आठवून भावुक झाले. त्यावेळी श्रद्धा घर सोडून आफताबसोबत राहात होती आणि दुसरीकडे तिच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. आईची तब्येत बिघडल्याने त्यांनी श्रद्धाला लग्न करायला सांगितले होते, मात्र श्रद्धानेच लग्नाला नकार दिला.
लेकीच्या लग्नाची इच्छा अपुरी -विकास वालकर हे डिसेंबर २०१९ मध्ये आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते, मात्र आफताबचा लहान भाऊ असद याने त्यांना घरात येऊ दिले नव्हते. त्यामुळे त्यांना निराश होऊन मागे परतावे लागले होते.
मुलीच्या लग्नाची वाट पाहतानाच जानेवारी २०२० मध्ये श्रद्धाच्या आईचे निधन झाले होते. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांना तसेच प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.