विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) हे गेल्या 14 ते 15 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. ते काल सायंकाळी अचानकपणे घरातून निघून गेले. त्यांचे दोन्ही फोनही बंद आहेत. कुटुंबीय तसेच पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. तत्पूर्वी, अर्थात नॉट रिचेबल होण्यापूर्वी त्यांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरे यांची माफीही मागितली. तसेच 'घातकी माणसांच्यासोबत गेलो आणि माझा घात झाला,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय, माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर कुणाला जबाबदार धरू? असा सवालही वनगा यांच्या पत्नीने केला आहे.
तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरे यांची माफी मागताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती, दिलेला शब्द पाळतात, हे माझ्या बाबतीत मला प्रामाणिकपणाने कळते. मी उद्धव ठाकरे यांची माफी मागतो. देवा मला माफ कर. तसेच, घातकी माणसांच्यासोबत गेलो आणि माझा घात झाला आज," असेही वनगा यांनी म्हटले होते. यावेळी ते धाय मोकलून रडत होते. ते टीव्ही ९ सोबत बोलत होते.
...तर मी कुणाला जबाबदार धरू? -तत्पूर्वी, श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या की, "ते (श्रीनिवास वनगा) कालपासून जेवतच नाहीयत, काही बोलतही नाहीयेत, वेड्यसारखे वागतात, आत्महत्या करणार असे बोलतात, माझे आयुष्य संपूण गेले असे म्हणतात. उद्धव साहेबांना देव मानत होते. त्यांचे सारखे नाव घेतात आणि सांगतात की माझी चूक झाली, मी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला शब्द दिलेला." एवढेच नाही तर, "त्यांनी 39 आमदारांचे पुनर्वसन केले. माझ्या पतीचे काय चुकले? त्यांचे काही बरे वाईट झाले तर मी कुणाला जबाबदार धरू?" असा सवालही यावेळी वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला.