अकोला /बुलडाणा/वाशिम : पश्चिम वर्हाडातील सात तालुक्यात अतवृष्टी झाली असून वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीच्या पुरात सोमवारी दुपारी एक जण वाहून गेल्याची घटना घडली. अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत (सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत) सरासरी ७५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत अतवृष्टी झाली आहे. रविवारपासून सुरु असलेल्या पावसाने सोमवारीही उसंत घेतली नाही. संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून, अकोला - अकोट मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत अतवृष्टी झाली. त्यामध्ये अकोला ९२.८, बाळापूर ८८.0, पातूर ७६.0, तेल्हारा ७६.0 व मूर्तिजापूर तालुक्यात ७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व नांदुरा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून खामगाव व नांदुरा तालुक्यात अतवृष्टी झाल्याची नोंद आहे. नांदुरा ७२ मिमी, खामगांव ६७ मिमी पावसाची नोंद झाली. नदीच्या पुरात युवक गेला वाहून वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. मानोरा तालुक्यातील अरूणावती नदीच्या पुरात सुनिल भोरकडे (२८) हा युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.सुनिल भोरकडे हा मित्रांसोबत सोमवारी दुपारच्या सुमारास शेतातून घरी परत येत हनुमान मंदीराजवळ असलेल्या नाल्याच्या बंधार्यावरून नदीच्या पुरात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत या युवकाचा शोध लागला नव्हता.
पश्चिम व-हाडात सात तालुक्यात अतिवृष्टी!
By admin | Published: July 12, 2016 12:58 AM