- तानाजी पोवार, सदानंद औंधे, कोल्हापूर/मिरज
रेल्वे अर्थसंकल्पात लोंढा-मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीसह, कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर-वैभववाडी या १०७ किलोमीटर नवीन रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडला जाणार आहे. मात्र, दुष्काळी भागातून जाणाऱ्या कवठेमहांकाळ-विजापूर या नवीन रेल्वेमार्गासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेल्वे अंदाजपत्रकात कोल्हापूर- मिरज- पुणे या ३२६ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ३२६ कोटी रुपये व मिरज-लोंढा या १८९ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या चार हजार कोटी खर्चाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणास मान्यता देण्यात आली आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मिरज-कवठेमहांकाळ-जत-विजापूर व कराड-कडेगाव-लेंगरे-खरसुंडी-आटपाडी-दिघंची-महूद-पंढरपूर या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले. मात्र, त्याचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे अंदाजपत्रकात मान्यता मिळालेली नाही. कराड-चिपळूण या नवीन मार्गाला गत अंदाजपत्रकात मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्याचेही काम अद्याप सुरू झालेले नाही.कोल्हापूर-वैभववाडी व कराड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. नवीन रेल्वेमार्ग वगळता कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्यांची रेल्वे अंदाजपत्रकात दखल घेण्यात आलेली नाही. १९२७ नंतर मिरजेपासून एकाही नवीन मार्गाची उभारणी झालेली नाही. मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याने, या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण तातडीने पूर्ण झाल्यास मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. देशातील चारशे रेल्वे स्थानकात वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे. त्यात मिरज व कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर व मिरज रेल्वेस्थानक मॉडेल बनविण्याची व मिरजेत रेल्वे हॉस्पिटल व मॉल उभारण्याची रेल्वे अर्थसंकल्पातील घोषणा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मिरज, सांगली व कोल्हापूर रेल्वे स्थानकात कोच इंडिकेटर, सीसीटीव्ही, तिकीट खिडक्यांची संख्या वाढविणे या प्रवासी सुविधांसाठी निधीची तरतूद आवश्यक आहे. छोट्या स्थानकांत एक्स्प्रेस थांबवाव्यात. वाहतुकीला अडथळा होणाऱ्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांची व्यवस्था व्हावी, या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत. असा असेल हा मार्गहा प्रस्तावित रेल्वेमार्ग हा वैभववाडी-उपळे-सैतवडे-भूतलवाडी-कळे-भुये-कसबा बावडा-रेल्वे गुडस मार्केट यार्ड (कोल्हापूर) असा आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरात जंक्शन उभारण्याची शक्यता आहे.कराड-चिपळूण मार्ग प्रतीक्षेतच गत अथसंकल्पात मंजुरी मिळालेल्या कराड-चिपळूण या रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद होणे अपेक्षित होते. ती न झाल्याने या मार्गाचे काम प्रत्यक्षात कधी सुरूहोणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हादेखील कोकण रेल्वेएवढाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.1375कोटींची तरतूद पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १०७ किलोमीटर अंतराच्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गासाठी एकूण ३०५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी १३७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे.