- वसंत भोसले (पश्चिम महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना आज स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात आजही स्वबळ उभी करण्यात अपयशीच ठरली आहे, असे म्हणायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय बळाच्या जोरावर कॉँग्रेसने अनेक वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. या पक्षाला पर्याय देण्याची निर्णायक ताकद इतर कोणत्याही पक्षांनी आजवर निर्माण केली नाही. याची कारणे दोन आहेत. एक तर सहकारी संस्थात्मक रचनेच्या माध्यमातून कॉँग्रेस विचारांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. त्यातून सामान्य माणसाला आधार देणारी शिवसेना ज्या पध्दतीने मुंबईत काम करते. तसेच काम कॉँग्रेस अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रात करत असल्याने या पक्षाचा आधार भक्कम आहे. तो तोडणे शिवसेनेला आजही कठीण जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून ५८ आमदार व दहा खासदार निवडून जातात. विद्यमान सभागृहात यापैकी बारा आमदार व दोन खासदार शिवसेनेचे आहेत. बारापैकी केवळ चार आमदार व एक खासदार मूळचे शिवसैनिक आहेत. बाकीचे सर्व आज शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत असले तरी त्यांची जडणघडण ही विविध पक्षांमध्ये झाली आहे. एकीकडे कॉँग्रेस विचारांच्या पक्षांची गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी असताना शिवसेनेला आपला पक्ष रुजविणे कठीण गेले. कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, म्हणून नेते तयार होत नाहीत. नेतृत्व नसल्याने संस्थात्मक बांधणी करुन कॉँग्रेसविरोधात टिकाव धरता येत नाही. आजही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेचे स्थान नगण्यच आहे. मुंबई किंवा कोकणात, तसेच काही प्रमाणात मराठवाड्यात शिवसेना ज्या पध्दतीने सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाते, लोकांना त्यांचा आधार वाटतो तशा स्वरुपाची कामे करण्यासाठी कॉँग्रेसची यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सामान्य माणस आजही शिवसेनेला स्वीकारत नाहीत किंवा त्यांच्याकडे जात नाहीत. आज जे आमदार किंवा खासदार निवडून आलेत, त्यातील बहुतांश जण हे कॉँग्रेसअंतर्गत निर्माण झालेल्या सत्तास्पर्धेतून शिवसेनेकडे वळले आहेत. त्यांच्या निवडणुकीपुरती शिवसेना दिसते आणि इतरवेळी मात्र ते कॉँग्रेस पक्षाप्रमाणे, कॉँग्रेसबरोबर काम करत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे सर्वाधिक सहा आमदार निवडून आले आहेत. मात्र दोघांचा अपवाद सोडला तर बाकीचे केव्हाही समाजात शिवसेना म्हणून सहभागी होत नाहीत. परिणामी शिवसेनेचा एक पक्ष म्हणून विस्तार खुंटलेलाच आहे. कॉँग्रेस पक्षांच्या अंतर्गत स्पर्धेतून ज्यांना संधी मिळत नाही, तेच शिवसेनेचा आधार घेतात आणि शिवसेनेकडे बहुतांश भागात नेतृत्व नसल्याने शिवसेना त्यांचा उसनवारीसारखा आधार घेऊन कॉँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सेनेची पश्चिम महाराष्ट्रातील वाटचालही उसनवारीवर चालू आहे. २ खासदार । १२ आमदार बलस्थाने : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून ५८ आमदार व दहा खासदार निवडून जातात. विद्यमान सभागृहात यापैकी बारा आमदार व दोन खासदार शिवसेनेचे आहेत. बारापैकी केवळ चार आमदार व एक खासदार मूळचे शिवसैनिक आहेत.कमकुवत बाजू : मुंबई किंवा कोकणात, तसेच काही प्रमाणात मराठवाड्यात शिवसेना ज्या पध्दतीने सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाते, लोकांना त्यांचा आधार वाटतो तशा स्वरुपाची कामे करण्यासाठी कॉँग्रेसची यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे सामान्य माणस आजही शिवसेनेला स्वीकारत नाहीत किंवा त्यांच्याकडे जात नाहीत.